support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language

About Dang Seva Mandal

डांग सेवा मंडळ' आदिवासी भागातील एक 'व्रतस्थ' सेवाभावी संस्था

गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ 'एकच ध्यास,वंचितांचा विकास' हे व्रत हाती घेऊन आदिवासी भागात अहोरात्र काम करून सामाजिक प्रतिष्ठा व गुणवत्तापूर्ण उंची प्राप्त करून नावारूपाला आलेली संस्था म्हणजे 'डांग सेवा मंडळ,नाशिक'. कर्मवीर दादासाहेब बिडकर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी भागात भूमिगत राहून सक्रिय राहिलेत.डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न फार बिकट होता. स्वातंत्र्यपूर्व काळ, इंग्रजांचे अत्याचार, गुलामगिरी,दारिद्र्य यात पिचलेला आदिवासी समाज वीज, पाणी, रस्ते नसलेल्या या डोंगरात तीस ते चाळीस किलोमीटर सतत पायी प्रवास करून, दादांनी शिक्षणाविषयी जनजागृती सुरू केली. गांधीवादी विचारसरणी असल्याने जंगल सत्याग्रह, कायदेभंग चळवळ अश्या विविध स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर राहिलेत. अनेकवेळा तुरुंगवासही भोगला.दुर्लक्षित समाज शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी २३ जून १९३७ रोजी मुल्हेर येथे डांग सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती व शिक्षण या विषयावर भर देण्यात आला. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी दादांनी जंगल कामगार सोसायट्या निर्माण केल्यात.
शेतकऱ्यांसाठी धान्यकोठार ( ग्रेन बँक) ही संकल्पना आजही सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे म्हणून धान्य वाटप करणे व उत्पन्न मिळाल्यावर नागाली आणि वरई म्हणून हे धान्य आश्रमशाळेतील मुलांसाठी वापरले जाते. दादांच्या वार्धक्याने ही जबाबदारी (स्व.) डॉ.विजयजी बिडकर यांच्या खांद्यावर आली. जुन्या कुडाच्या भिंतीत चाललेल्या या शैक्षणिक प्रपंचाला डॉ.बिडकर यांनी शहरी भागा इतके भव्यदिव्य रूप प्राप्त करून दिले. डॉ.बिडकर व त्यांच्या पत्नी विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बिडकर यांनी संपूर्ण जीवन आदिवासी भागातील जनतेच्या वैद्यकीय,सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतलं. त्यांची कन्या विद्यमान सचिव अँड.मृणालताई जोशी यांनी आजोबा व आई वडिलांच्या कार्याचा आदर्श ठेवीत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ही पताका पुढे नेत आहेत.उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे सर्व कार्यकारिणी सदस्य दादांच्या बरोबरीने आजही या तिसऱ्या पिढीचे मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून खंबीरपणे कार्यरत आहेत. आज संस्थेचा वटवृक्ष झालाय.हजारो विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत आहेत. अनेक लोकप्रतिनिधी,वर्ग एक,दोन अधिकारी,उद्योजक,कलावंत व क्रीडापटू तयार झालेत,संस्थेचा नावलौकिक वाढला. शहरी भागाप्रमाणेच ही आदिवासी मुलं डिजिटल वर्ग व इ लर्निंग च्या साहाय्याने यशाला गवसणी घालत आहेत. आव्हाने आहेतच,पण अनेक आव्हाने झेलत 'डांग सेवा मंडळ' मोठया दिमाखात उभे आहे. केवळ आपल्यासारख्या हितचिंकांच्या जोरावर. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देत आज प्रत्येक क्षेत्रात आदिवासी भागात कार्यरत आहेत. नासिक जिल्ह्यातील केवळ आदिवासी भाग हाच केंद्रबिंदू डांग सेवा मंडळाने ठेवला. आज संस्थांतर्गत पाच माध्यमिक विद्यालय,चार कनिष्ठ महाविद्यालय,चार वरिष्ठ महाविद्यालय,सात आश्रमशाळा,अकरा वसतिगृहे,पाच इंग्लिश मिडीयम स्कुल व दोन धान्य कोठार असा विस्तार आहे.प्रा.किरण सूर्यवंशी,अभोणा.

about-image

about-image